राज ठाकरे यांचा आरोप; राज्य सरकारवर टीकास्त्र
पुण्यातील एका नामवंत कंपनीत मोठय़ा प्रमाणावर रिक्षा विक्रीसाठी तयार असून, या उद्योगपतीच्या फायद्याकरिताच ७० हजार रिक्षा परवाने देण्याची घाई सरकारने सुरू केल्याचा आरोप करतानाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या रिक्षा रस्त्यावर आल्यास सरळ जाळून टाका, असा धक्कादायक आदेश बुधवारी कार्यकर्त्यांना दिला.
मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यापुढे इंजिन घसणार नाही, असे सांगत पक्ष वाढीचा निर्धार केला. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीही फरक नसून, भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले, असे म्हणण्याची वेळ आल्याचेही मत त्यांनी मांडले. सध्या रिक्षा परवान्यांचा प्रश्न गाजत असल्याच्या पाश्र्वभूमीवर बोलताना मराठी भाषा येणाऱ्यांनाच रिक्षा परवाने देण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. न्यायालयाने नाही त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नये, असे धाडसी मतही त्यांनी मांडले. महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकच आहे. बिगरमराठी लोकांना रिक्षा परवाने देण्याचा काही जणांचा प्रयत्न असून, मनसे हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला. या रिक्षा रस्त्यावर आल्यावर त्यातील प्रवासी आणि चालकाला उतरवा आणि मगच जाळा, धककादायक आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. एका रिक्षाची किंमत ही एक लाख २० हजार रुपये आहे. सुमारे ७० हजार परवाने देण्याचा घाट राज्य सरकार आणि शिवसेनेकडे असलेल्या परिवहन खात्याने घातला आहे, असा आरोप त्यांनी केला.
विजय मल्या देशाबाहेर पळून गेल्याबद्दल राज यांनी आश्चर्य व्यक्त करीत याबाबत सरकारने नरमाईची भूमिका का घेतली, असा सवालही त्यांनी केला.