पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणे सलमान खानला चांगलेच महागात पडताना दिसत आहे. या मुदद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सलमान खानवर आगपाखड केली आहे. सीमेवर जवान आपल्यासाठी लढत आहेत. त्यांनी शस्त्रे ठेवली तर सलमान खान सीमेवर जाऊन उभा राहणार आहे काय ? असा सवाल राज यांनी केला. भारतात एवढे कलाकार असताना सलमानला पाकिस्तानातील कलाकारांचा इतकाच पुळका येत असेल तर त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे असे त्यांनी सुनावले.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सलमानने पाक कलाकारांच्या समर्थनात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. पाण्यासाठी तामिळनाडू व कर्नाटकमध्ये वाद सुरू आहे. या वादात तामिळनाडूच्या कलाकारांनी तामिळनाडूची बाजू घेतली. त्यांनी कर्नाटकला पाठिंबा दिला नाही. ते त्यांच्या लोकांसाठी उभे राहिले. चित्रपटसृष्टीतील कलाकार किंवा निर्मात्यांनी तर शहीद जवानांना श्रद्धांजलीही वाहिली नाही.
सलमानला जर पाकिस्तानच्या कलाकारांबद्दल एवढा पुळका असेल तर त्यांनी तिथे जाऊन आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करावे. फक्त आपल्या व्यवसायासाठी ते पाकिस्तानची बाजू घेतात. सीमेवर जवान आपल्यासाठी गोळया खातात.
१२० कोटींच्यावर आपली लोकसंख्या आहे. या देशात कलाकार मिळत नाहीत का? पाकिस्तानच्या कलाकारांना का काम देतो असा सवाल केला. पाकिस्तानचे कलाकार अतिरेकी नसतील पण खबरे नसतील काय अशी शंकाही उपस्थित केली. पाकिस्तान हा कधीही न सुधारणारा देश आहे. अशाप्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
आयपीएलमध्ये जेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना घेण्यात आले नाही. तेव्हा भारताच्या एकाही खेळाडूने पाकिस्तानी खेळाडुंची बाजू घेतली नाही. पण इथे सगळी चित्रपटसृष्टी लगेच आरडाओरड करायला लागते. कलावंतांपेक्षा इथले निर्माते आणि कलाकारच दोषी आहेत. यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकत नाही. तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. यांचे चित्रपट लावू नका असे आम्ही चित्रपटगृहांना सांगितले आहे.