मोकळ्या जागा लोकांच्या हितासाठी मोकळ्या राहिल्याच पाहिजेत. आरे कॉलनीची जागा रिकामी करून हडपण्याचा सरकारचा डाव आहे. हेच करायचे होते तर मग पूर्वीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आणि सध्याचे भाजप सरकार यामध्ये फरक काय, असा सवाल उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर सोमवारी तोफ डागली. आघाडी सरकारची री ओढायला सत्तेवर आलात का, अशीही टीका त्यांनी यावेळ केली.
मेट्रोची कारशेड आरे कॉलनीमध्ये उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी आरे कॉलनीला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, विकासाच्या प्रकल्पांना आमचा विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली मोकळ्या जागा हडपण्याचा सरकारचा डाव आहे. निवडणुकीवेळी भाजपला केलेल्या आर्थिक मदतीची परतफेड अशा पद्धतीने केली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
पूर्वीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही सत्तेवर आलात का, असा प्रश्न भाजप सरकारला विचारून ते म्हणाले, गोराईजवळची १५०० एकर जमीन विकसनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारचे बिल्डरांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे, असाही आरोप त्यांनी केला.
मेट्रोसाठी झाडे तोडण्यास आपल्या पक्षाचा विरोध राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गुढीपाडव्यानंतर यासंदर्भात एक कार्यशाळा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.