पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यावेत ही पाकिस्तानी लष्कराची इच्छा आहे हा लेख ब्रिटिश महिला पत्रकाराने बीबीसीसाठी लिहिला आहे. हा लेख तुम्ही वाचा, हा लेख वाचल्यावर मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअरस्ट्राईक करून उत्तर दिल्याचं सांगितलं मात्र त्या मुद्द्याचं राजकारण सुरु आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणात ब्रिटिश पत्रकार क्रिस्टीन फायर यांच्या लेखाचंही उदाहरण दिलं.

क्रिस्टीन फायर यांनी लेखात काय आहे? त्याचा अंश- 
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जो एअर स्ट्राईक करण्यात आला त्याचा थेट संबंध निवडणुकांशी आहे. या कारवाईनंतर मोदी पुन्हा निवडून आले तर पाकिस्ताला फायदा होईल असा उल्लेख क्रिस्टीन यांनी त्यांच्या लेखात केला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांचा संबंध भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांशी आहे. भारतात हल्ले होतच असतात, पुलवामाचा हल्ला वेगळा होता. अतिशय नियोजनबद्धपणे या हल्ल्याची आखणी करण्यात आली होती. पुलवामाच्या हल्ल्यात जवानांना लक्ष्य करण्यात आलं ही गोष्ट प्रक्षोभित करणारी होती. भारतीय जनता ही लष्कर आणि जवानांबाबत खूप भावूक आहे. जैश-ए-मोहम्मदनं 2000 नंतर कोणताही आत्मघातकी हल्ला केला नव्हता. १९ वर्षांनंतर हा हल्ला करण्यात आला असून त्याचा उद्देशच जनभावना भडकवण्याचा होता. हल्ल्याची वेळही खूप विचारपूर्वक निवडण्यात आली होती. यामुळेच हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रियांचा ओघ पहायला मिळाला.खरंतर भारतातील निवडणुकांमध्ये मोदींचा विजय झाल्यानं सर्वाधिक फायदा हा पाकिस्तानी ‘डीप स्टेट’ला होणार आहे. भारतीयांना ही गोष्ट रुचणारी नसेल. असं बीबीसीला दिलेल्या लेखात क्रिस्टीन फायर यांनी म्हटलं आहे. याच लेखाचा आधार घेत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

पुलवामा हल्ला, त्यानंतर झालेला एअर स्ट्राईक याकडे जग कसं बघतं आहे याचा थोडा विचार करा असंही आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे. तसंच आपण आपल्या संपूर्ण कारकिर्दीत इतका खोटारडा माणूस पाहिलेला नाही अशीही टीका राज ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरून पुन्हा एकदा भाजपा विरूद्ध ऱाज ठाकरे असा सामना बघण्यास मिळणार यात काहीही शंका नाही.