महाराष्ट्र आणि मुंबई वेगळी का नको, अशा आशयाचे ट्विट करणाऱया प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस शब्दांत बुधवारी समाचार घेतला. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणे, हे घटस्फोट घेण्याइतके सोपे नसल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. शोभा डे यांनी अशा आशयाचे विधान करणे योग्य नसल्याचे मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईमध्ये वृत्तवाहिनीच्या काही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना शोभा डे यांच्या ट्विटबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शोभा डे यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीला हुतात्म्यांचे स्मरण होत नाही, हे जास्त दुर्दैवी आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे म्हणाले.
मुंबई आणि महाराष्ट्राची जनता शोभ डे यांचे वक्तव्य कधीही सहन करणार नाही. त्यांना इतिहासाची माहिती नाही, त्यांनी तो समजून घ्यायला हवा, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.