भाजपला घाबरविण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याच्या बातम्या पसरवल्या जात असून त्याचा राजकारणासाठी उपयोग केला जात असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केला. भय्यूजी महाराजांकडून वारंवार निमंत्रण येत असल्याने इंदोरच्या एका कार्यक्रमासाठी त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. मात्र तेथून परत आल्यानंतर उद्धवसोबत फार्म हाऊसमध्ये भेट झाल्याची बातम्यांना सुरुवात झाली, असा खुलासा करत या सर्व बातम्या खोटय़ा असून भाजपला घाबरवण्यासाठी शिवसेनेकडून त्या पेरल्या जात आहे, असाही आरोप त्यांनी या वेळी केला.
सत्ता बदलानंतर मात्र परिस्थितीत कोणताच बदल झालेला नाही. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा जातीयवादीचे बीज रोवले जाऊ लागले आहे. या जातीयवादामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या छत्रपतींसाठी हयात घालवणाऱ्या व्यक्तीचा बळी घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे कदापि सहन केले जाणार नाही. ठाण्यातील राष्ट्रवादी नेत्याची या प्रकरणात वळवळ सुरू असल्याची सांगत त्यांनी आव्हाड यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. राष्ट्रवादी पक्षाची सुरुवात झाल्यापासून जातिवादाची बीजे अधिक पेरली जात असून महाराष्ट्रातील मान्यवरांना जातीची लेबले लावण्यास सुरुवात झाली आहे. इतिहास मान्य नसेल तर त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र, चर्चेसाठी पुढे येण्यापेक्षा वैयक्तिक टीका करण्याकडेच या मंडळींचा भर राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंग्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. शिक्षणमंत्री शिक्षणाचा बोजा पाहताना चक्क दप्तराचे वजन करतात हे हस्यास्पद आहे, असेही ते म्हणाले.

सलीम खान यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी..
याकूब मेमनप्रकरणी टिप्पणी करणाऱ्या सलमान खान याची दखल घेताना वडील कुठे, तू कुठे? असा सवाल त्यांनी केला. सलमान खान याच्यावरील शिक्षेनंतर त्याच्या घरी जाण्यामागे त्याचे वडील यांची भेट घेणे हा हेतू होता. सलीम खान यांनी अनेक वाईट प्रसंगी मदत केली. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी गेलो असा खुलास त्यांनी या वेळी केला. सलमानला न्यायालयाने शिक्षा द्यावी, त्याबद्दल आपले काहीच म्हणणे नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘मनकी बात म्हणजे मौनकी बात’
पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांची मनकी बात म्हणजे मौनकी बात बनले आहे, मूळ विषयावर ते काही बोलत नसल्याची टीका त्यांनी केली. याकूब मेमनसारख्या देशद्रोह्य़ाला शिक्षा झाल्यानंतर याचा तमाशाच करण्यात आला होता. माध्यमांनी या गोष्टीला अधिकच खतपाणी घातले. न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असला तरी असे निकाल देण्यासाठी २२ वर्षांचा काळ लागतो. न्याय व्यवस्थेबद्दल मनात आदर असला तरी त्यांनी हा आदर गमावू नये.