सरकार म्हणून निर्णय घेताना व घेतल्यानंतर ठाम राहिले पाहिजे. तथापि मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाला प्राइम टाइम देण्याची घोषणा करून प्रसिद्धी मिळवायची आणि नंतर मात्र माघार घ्यायची, असे ‘शेपूट घालणारे’ काम सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केल्याची जोरदार टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना केवळ प्राइम टाइमच नव्हे, तर एक स्क्रीन मिळाला पाहिजे असा नियम असून त्याची कठोरपणे अंमलबजावणी सरकारने करावी अशी मागणीही राज ठाकरे यांनी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषदेत केली. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांना परवानगी देतानाच तेथे एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठी असला पाहिजे, तसेच नाटय़गृह व चित्रप्रदर्शन अथवा तत्सम प्रदर्शनासाठी जागा ठेवणे बंधनकारक आहे. तावडे यांनी मोठय़ा आवेशात मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्याची घोषणा केली व नंतर घूमजाव करून सकाळी नऊ ते बारा या वेळात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची भूमिका घेतली. हे सरकार कोणाला घाबरते असा सवाल करत मराठी चित्रपट चालत नाहीत अथवा त्यांना प्रेक्षक मिळत नाहीत हा आक्षेप त्यांनी खोडून काढला. अनेक हिंदी चित्रपटही चालत नाहीत म्हणून त्यांना प्राइम टाइममधून वगळले जाते का असा सवालही राज यांनी केला. अनेकदा हिंदी चित्रपटही पडतात. त्यांना प्रेक्षक मिळत नाहीत. असे असतानाही सरकार ठाम भूमिका का घेत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. यापुढे मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीन राखीव ठेवावाच लागेल असे ठणकावून सांगण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन करताना मनसेने या प्रश्नी त्यांच्या पद्धतीने कारवाई केली तर टीका करू नका, असा इशाराही दिला.