नवी मुंबईतील वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे रविवारी संध्याकाळी वाशी येथे येत आहेत. या वेळी त्यांचा भावे नाटय़गृहात एक कार्यकर्ता मेळावा होणार असून ते शिवसेनेच्या शिवबंधन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नाशिक येथील मूर्तिपूजनाबाबत काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या वेळी ते ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नावदेखील जाहीर करण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई मनसेची काही महिन्यांपूर्वी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांकडून काही आंदोलनांची धुरा वाहिली गेली आहे. पक्षाला मध्यवर्ती कार्यालय असावे यासाठी वाशी सेक्टर २६ मध्ये भाडय़ाने घेतलेल्या जागेत एक कार्यालय सुरू केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन करून ठाकरे भावे नाटय़गृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेने शिवसैनिकांना एका बंधनात बांधून ठेवण्याच्या उद्देशाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवबंधनाचा गंडा घातला आहे. त्यावर राज ठाकरे काय बोलतात तसेच राज्यात आपचा ताप किती आहे यावरही ते आपली मते अधिक स्पष्ट करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केजरीवालपेक्षा आयटम गर्ल राखी सावंत चांगले सरकार चालवू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसेने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतल्यास ठाण्यातून नीलेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.