16 November 2019

News Flash

राज ठाकरे यांच्या हस्ते १११ पेन्टिंगच्या प्रदर्शनाचे उदघाट्न

जेष्ठ चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंती निमित्त प्रदर्शनाचे आयोजन

जेष्ठ जलरंग चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या जलरंग चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घघाटन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचे नातू केदार कामत, ख्यातनाम चित्रकार व जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता प्रभाकर कोलते, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता कृष्णा कामत, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता वसंत सोनवणी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “धवल रेषा” या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथात प्रा. प्रल्हाद अनंत धोंड सरांच्या आठवणी, त्यांचे कलेवर असणारे नितांत प्रेम हे लेखांद्वारे त्यांचे निकटवर्तीय, त्यांचे शिष्य व दिग्गज मान्यवरांनी मांडले आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी प्रल्हाद धोंड यांच्या आठवणी जागृत केल्या. मी आज येथे कुठल्याही पक्षाचा नेता म्हणून आलो नाही तर माझ्या कलानगरच्या कुटुंबासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. भाईंना चित्र काढताना मला पहायला मिळाले हे माझ्यासाठी भाग्यच होते. धवल रेषा काढण्यात त्यांचा हातखंडा होता, ते काढणे सोपे नसते, त्यासाठी मोठी तपश्चर्या करावी लागते असे ते म्हणाले.

तर प्रभाकर कोलते यांनी प्रा. धोंड यांच्यावर केलेली कविता सादर केली. वसंत सोनवणी यांनी सर हे उत्तम नक्कलाकार होते व त्यांच्यातील मिश्किलपणा गुण ही सांगितला. लुप्त होणारी ही जलरंग चित्रांची अप्रतिम कला पुन्हा एकदा जिवंत व्हावी, यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न असून त्यांच्या या चित्रांचा अमीट ठेवा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शनपर राहील असे केदार कामत यावेळी म्हणाले. हे प्रदर्शन ११ जून ते १७ जून या कालावधी पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

First Published on June 12, 2019 8:48 pm

Web Title: raj thackeray inaugureat of 111 pentings exhibition msr 87