मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी तब्बल नऊ तास चौकशी केली. गरज भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

आयएल अ‍ॅण्ड एफएस या खासगी वित्तीय पायाभूत संस्थेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार, अनियमिततेत ठाकरे यांचा सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी ईडीने त्यांना नोटीस बजावली होती.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी, बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर हे भागीदार असलेल्या कंपनीने कोहिनूर गिरणीचा भूखंड ४२१ कोटी रुपयांना विकत घेतला होता. तेथील विकास प्रकल्पासाठी आयएलएफएस संस्थेकडून सुरुवातीच्या काळात कर्ज घेण्यात आले होते. जोशी, शिरोडकर यांच्यासोबत ठाकरे हेही या प्रकल्पात भागीदार होते. मात्र २००८च्या सुमारास ते या प्रकल्पातून बाहेर पडले. त्याच वेळी आयएलएफएस संस्थेने प्रकल्पात २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याच गुंतागुंतीच्या व्यवहारांमध्ये अनियमितता झाली, असा आरोप आहे. गेल्या काही दिवसांत ईडीने जोशी, शिरोडकर यांचीही चौकशी केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठ तासांच्या चौकशीत ईडी अधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा जबाब नोंदवून घेतला. भूखंड खरेदी, खासगी संस्थेकडून घेतलेले कर्ज, माघार, खासगी संस्थेची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष मिळालेला फायदा आदी व्यवहारांबाबत ईडीने ठाकरे यांना प्रश्न विचारले.

ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या पाश्र्वभूमीवर मनसे कार्यकर्ते शहरात असंतोष निर्माण करतील हा अंदाज बांधून मुंबई पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ईडी कार्यालय आणि पक्षाचे अस्तित्व असलेल्या भागांत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी अकराच्या सुमारास ठाकरे हे पत्नी शर्मिला आणि कुटुंबासह बॅलार्ड पिअर येथील ईडीच्या विभागीय कार्यालयापाशी पोहोचले. रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. पोलिसांच्या अपेक्षेनुसार शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पक्षाच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर काहींच्या निवासस्थानाबाहेर आणि पक्ष कार्यालयांबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.