महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली. नारायण राणे यांच्यावर नुकतीच अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  ते सध्या लीलावती रूग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे राज यांनी आज रूग्णालयात जाऊन नारायण राणे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांचे सांत्वन करण्यासाठी नारायण राणे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गेले होते.
विधानपरिषेदवर निवडून गेलेल्या नारायण राणे यांच्यामुळे गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच अधिवेशनात विरोधकांचे अस्तित्व जाणवले होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे नारायण राणेंना बराच काळ सभागृहाबाहेर राहवे लागले होते. मात्र, विधानपरिषदेत दाखल झाल्यानंतर आक्रमक स्वभावाच्या राणेंनी ही सगळी उणीव भरून काढली होती. नारायण राणे यांच्यासमोर इतर विरोधक फिके वाटू लागले होते. मात्र, ही गोष्ट लक्षात येताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार सारेच आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून पाच अधिवेशनांमध्ये विखे पाटील आपला प्रभाव पाडू शकले नव्हते, पण सहाव्या म्हणजेच सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात त्यांची छाप पडली. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तसेच कलंकित मंत्र्यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या भाषणाची वाहवा झाली होती. एकुणच नारायण राणे यांच्या सभागृहातील आगमनामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांची कामगिरी सुधारली होती. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आपल्याच समर्थकाची नियुक्ती करावी, असा आग्रह लावून धरला होता. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राणे यांच्या कलानेच नियुक्त्या केल्या जातात. आगामी  निवडणुका लक्षात घेता राणे यांच्या मतानुसारच नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.