‘पुढे काय करायचं? हा आमच्यासमोरील प्रश्न आहेच. आमच्या सभांना मोठी गर्दी होते. मतांच्या राजकारणासाठी सारे प्रयोगही करून झाले पण निवडणुकीत मात्र मते मिळत नाहीत. त्यामुळे भविष्यात एकच प्रयोग आता बाकी आहे,’ अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली, आणि आठवले-राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडले असावे याचा काल्पनिक पट अनेक राजकीय निरीक्षकांच्या नजरेसमोर उभा राहिला.

रामदास आठवले आणि राज ठाकरे यांनी आपल्या कलागुणांचा राजकारणात खुबीने वापर केल्यामुळे दोघाही नेत्यांची भाषणे ही महाराष्ट्रातील श्रोत्यांना पर्वणी असते. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होते. निकटवर्तीयांच्या वर्तुळातही त्यांच्या खुमासदार गप्पांच्या मैफिली रंगतात. राज ठाकरे यांच्या मिमिक्रीमुळे तर आठवले यांच्या शीघ्रकवित्वाच्या शैलीमुळे राजकारणाच्या रटाळ वातावरणात रंग भरतो. असे हे दोघे जण जेव्हा परस्परांना भेटतात, मैत्रीपूर्ण चर्चा करतात, तेव्हा ती बैठक कशी रंगली असेल यावर अनेक तर्क होणे साहजिकच असते. रामदास आठवले यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल त्यांचे सांत्वन करण्यासाठी काल राज ठाकरे यांनी आठवले यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, आणि तेच तर्क पुन्हा सुरू झाले. परस्परांवर कोटीबाज टीका करणारे हे दोन्ही नेते समोरासमोर आल्यावर त्यांच्या गप्पांचा फड रंगणारच, अशीच अनेकांची अटकळ होती. कालच्या भेटीत तसेच झाले, हे रामदास आठवले यांनी नंतर भेटीविषयी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले.

‘आम्ही फेरीवाल्यांच्या प्रश्नावर त्यांना पाठिंबा देतो, पण त्यांची मते मिळतच नाहीत. अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे राहतो, दलितांसाठी काम करतो, आमच्या दोघांच्याही सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो, पण मते मात्र मिळत नाहीत. त्यामुळे भविष्यात काय करायचे हा दोघांचाही प्रश्न आहेच’, अशी मिश्किल टिप्पणी रामदास आठवले यांनी केली, आणि ठाकरे-आठवले भेटीचे रंगतदार कल्पनाचित्र जिवंत झाले. ‘आमचे युती-आघाडीचे सारे प्रयोग करून झाले आहेत’, असे आठवले यांनी सांगताच, ‘पुढे काय करणार’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘आता एकच प्रयोग बाकी आहे’, एवढेच उत्तर देऊन आठवले क्षणभर गप्प झाले. हा ‘बाकी असलेला एकच प्रयोग’ कोणता असणार, यावर अंदाज बांधण्यास सुरुवात झाली, आणि लगेचच एक प्रश्न आला, ‘रिपाइं-मनसे युती हाच तो बाकी असलेला प्रयोग का?’ यावर काहीच न बोलता आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत डोळे मिचकावले आणि ते गालातल्या गालात हसले. भविष्यातील एका रंगतदार राजकारणावर एक हलकीशी ‘पुडी’ आठवले यांनी सोडून दिल्यामुळे राजकारणातील आजचा दिवस काहीसा हलकाफुलका होऊन गेला होता!