राज ठाकरे यांचा इशारा; फाटाफूट रोखण्याचे आव्हान
महापालिका निवडणुकांच्या तोंडवार मनसेमधून नगरसेवकांची होणारी फाटाफूट रोखण्याचे मोठे आव्हान राज ठाकरे यांच्यापुढे उभे राहिले आहे. या फाटाफुटीची गंभीर दखल घेत यापुढे पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांना धडा शिकविण्याचे आवाहन राज यांनी विभाग अध्यक्षांच्या बैठकीत केल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.
पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या दहा महापालिकांच्या निवडणुका होणार असून त्यापैकी मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातही मुंबईवर कोणत्याही परिस्थितीत वर्चस्व मिळविण्याचा चंग भाजपने बांधल्यामुळे महापालिकेतील युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर मनसेचे नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकारी गळाला लावण्यासाठी शिवसेना व भाजपने जोर लावला असून त्यांच्या गळाला मनसेचे अनेक नगरसेवक लागत आहेत. मुंबईतूनही मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केल्यामुळे राज यांनी त्याची गंभर दखल घेत गेल्या आठवडय़ात पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत मला जुना राज बनण्यास भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी दिला होता.
यानंतरही मुंबईतील दोन नगरसेवकांनी भाजपध्ये प्रवेश केल्यामुळे राज यांनी विभाग अध्यक्षांची बैठक बोलावून पक्षातून फुटणाऱ्या नगरसेवकांना धडा शिकविण्याचे आदेश विभाग अध्यक्षांना दिले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजपच्या भ्रष्ट कारभारावर तुटून पडण्याचे आदेशही राज यांनी दिले.
यापूर्वी पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची राज यांनी फारशी दखल घेतली नव्हती. तथापि महापालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांची होणाऱ्या फाटाफूटीचा मनसेवर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊन फुटणाऱ्या नगरसेवकांना धडा शिकविण्याचे आदेश दिले.