नीटच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याचा राजकीय अर्थ काढू नका, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. राज्यातील विद्यार्थ्यांचा विषय आहे. म्हणून आपण नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलल्यावर या प्रश्नावर त्यांच्याही संवेदना जाग्या असल्याचे मला दिसले. पण आता कोणीही या विषयाला राजकारणाचे पदर चढवू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने यंदापासून बंधनकारक केलेल्या ‘नीट’ परीक्षेसंदर्भात काही पालकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी पालकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या संदर्भात आपण रविवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली असून, त्यांनाही या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले होते. या परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे हा देश नक्की चालवतंय कोण सरकार की न्यायालये, असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला होता.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नीटवरून राज ठाकरे यांनी थेट मोदींशी चर्चा केल्याचे विविध राजकीय अंदाज बांधण्यात येऊ लागले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्वतः असे कोणतेही राजकीय अंदाज बांधू नका, असे स्पष्ट केले.