राज ठाकरे यांच्याकडून नेत्यांची खरडपट्टी

‘महापालिका निवडणुकीत माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यात तुम्ही कमी पडलात’ अशा खरमरीत शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते व सरचिटणीसांना सुनावले, तर, अनेक विषयांवर तुमच्याकडून भूमिकाच येत नाही, अशी टीका नेत्यांकडून करण्यात आली. प्रथमच मनसेचे नेते व सरचिटणीसांनी राज यांच्यावर बैठकीत निशाणा साधला असला तरी दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीतून आगामी वाटचालीला मात्र कोणतीही दिशा मिळू शकली नाही, असे एका नेत्याने सांगितले.

महापालिका निवडणुकीतील मनसेच्या धक्कादायक पराभवाच्या पाश्र्वभूमीवर गेले महिनाभर बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेच्या सर्व नेत्यांनी मुंबईत विभागवार बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यातील बहुतेक बैठकांमध्ये नेत्यांकडून मार्गदर्शन नसल्याची तसेच राज ठाकरे फारसे उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. वेळोवेळी पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची घोषणा करूनही राज ठाकरे अथवा नेत्यांकडून तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाहीच शिवाय अशा लोकांनाच पदे बहाल करण्यात आल्याची टीका जवळपास प्रत्येक बैठकीत झाली होती. ‘नेते संपर्कात नसतात’ तर ‘राज ठाकरे भेटू शकत नाहीत’ अशा कात्रीत सापडलेल्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरातील बैठकांमध्ये आपले मन खुलेपणे मोकळे केले होते. त्याची माहिती बाळा नांदगावकर व अविनाश अभ्यंकर यांनी राज यांनी आजच्या बैठकीत दिली.

बैठकीत, अनेक विषयांवर पक्षाकडून भूमिका मांडली जात नसल्याचे मत नेत्यांनी मांडले. मराठी माणसाबरोबर अन्य धर्मियांनाही जवळ केले पाहिजे, असेही काही नेत्यांनी सांगितले. तथापि माझी भूमिका लोकांपर्यंत नेण्यात तुम्हीच कमी पडलात, असा प्रतिवाद राज यांनी केला. मराठीच्या मुद्दय़ावर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. आजपर्यंत जी भूमिका मी मांडली तीच यापुढेही कायम राहील मग निवडणुकांचे निकाल काहीही लागो असेही राज यांनी सुनावले. पालिका निवडणुकीनंतर तब्बल दोन महिन्यांनी झालेल्या या बैठकीतून ठोस मात्र काहीही घडू शकले नाही. आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असेल याचे कोणतेही धोरण ठरू शकले नाही, असे एका नेत्याने सांगितले. याबाबत थेट राज ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई व अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते उपलब्ध झाले नाहीत. ‘आज अशी प्रदीर्घ बैठक झाली’ असे बाळा नांदगावकर म्हणाले. बैठकीतील चर्चेचा तपशील उघड करण्यास मात्र नांदगावकर यांनी नकार दिला.