महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सकाळी अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर अवतरले.  राज यांच्याबरोबर बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, अविनाश अभ्यंकर हे खास मर्जीतील नेतेही हजर होते. काही वेळापूर्वीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावरून निघाले असून ते थोड्यावेळात कृष्णकुंज येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. साधारण अर्धा तास ही बैठक सुरू होती. त्यामुळे आता या भेटीमागचे कारण काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी भेट आहे.
राज ठाकरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण
गेल्या दोन भेटींमध्ये चर्चेचा विषय नीट परीक्षा असला तरी प्रत्येकवेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीही अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. याशिवाय, मनसे नेते बाळा नांदगावकर कालच राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले होते. मात्र ही भेट कौटुंबिक असल्याचे स्पष्टीकरण नंतर देण्यात आले होते.