अनेक वैद्यकीय महाविद्यालये काँग्रेसची असल्याने राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी ‘नीट’ परीक्षेच्या मुद्दय़ावर भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे हाल होत असून तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ मे रोजी भेट घेणार आहेत.
विद्यार्थी व पालकांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची दादर येथील ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, सरकारला डान्सबारची काळजी आहे, पण विद्यार्थ्यांची नाही?विद्यार्थ्यांनी जीवाचे काही बरेवाईट केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? केंद्र सरकारला राज्यांचे महत्व कमी करायचे आहे.