पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केलेल्या भाषणावर काँग्रेसने कडाडून टीका केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोदींच्या या भाषणावर आपल्या कुंचल्याद्वारे निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी नवे व्यंगचित्र काढले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणाचा संदर्भ आहे. मोदींना राजकारणासाठी काँग्रेसच्याच माजी नेत्यांची गरज का पडते आहे असा सवाल राज यांनी आपल्या कलाकृतीतून विचारला आहे.

मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा नेहरू-पटेल वाद उकरून काढत, सरदार पटेलांवर काँग्रेसने पंतप्रधानपदी न बसवून अन्याय केल्याचा गंभीर आरोप केला होता. राज ठाकरेंनी हाच मुद्दा पकडून मोदींना फटकारे मारले आहेत. राज यांच्या नव्या कार्टूनमध्ये महात्मा गांधी पंतप्रधान मोदींना समजावताना म्हणतात, ”अरे बेटा नरेंद्र, तुला जरा दोन गोष्टी सांगायच्या आहेत! जवाहरलालना पंतप्रधान मी केले! काँग्रेसने नाही. यावर काही बोलायचंय? आणि दुसरं म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री होते, तरी ते काँग्रेसचेच नेते होते ना? मग तुला त्यांचा पुतळा का उभारावासा वाटला! पण, तू जिथून आलास, त्या हेडगेवारांचा किंवा गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला? प्रचारक होतास ना तू?

या कार्टूनमधून शेवटी राज यांनी संघ परिवारालाही लक्ष्य केले आहे. संघ परिवाराला मोदींच्या नेतृत्वात देशात एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही पुन्हा काँग्रेसच्याच नेत्यांचाच का वापर करावा लागतोय? अशा सवाल त्यांनी विचारला आहे.