मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यांची रवानगी कर्जतच्या फार्महाऊसवर केली आहे. यापैकी बॉन्ड नावाच्या कुत्र्याने मंगळवारी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याचा चावा घेतला होता. यामध्ये शर्मिला यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. कृष्णकुंज या निवासस्थानी गेल्या काही वर्षांपासून हे कुत्रे पाळण्यात आले होते. मात्र, सोमवारच्या घटनेमुळे ‘बॉन्ड’सोबत इतर दोन ग्रेट डेन कुत्र्यांना कर्जतच्या फार्म हाऊसवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
शर्मिला ठाकरे यांच्यावर सध्या हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या चेहऱ्याला ६५ टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गरज पडल्यास त्यांच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरीही करावी लागू शकते असे हिंदुजामधील डॉक्टरांचे म्हणणे आहे. या सगळ्या घटनेनंतर ठाकरे कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी सुत्रांच्या माहितीनूसार, शर्मिला यांचा पाय चुकून कुत्र्याच्या पायावर पडल्यामुळे कुत्रा त्यांना चावला होता.
राज ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. त्या पत्रकार परिषदेच्या आधी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राज यांना लगचेच याची माहिती मिळाली. मात्र, पत्रकार परिषद आधीच ठरलेली असल्याने ती आटोपून मग ते तातडीने रुग्णालयात गेले.