राज यांची टीका; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सत्तेची फळे भोगून विरोधकांप्रमाणे वागत असलेली शिवसेना ढोंगी आहे आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजप-शिवसेनेचे नेते मात्र खोटे बोलत आहेत, असा आरोप करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-सेनेवर आज पुन्हा शरसंधान केले. शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची िहमत नसल्याची टीका करीत स्वतंत्र विदर्भासाठी मतदान करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन आपली भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना-भाजप नेते महापालिकेत एकत्र पैसे खातात आणि एकमेकांवर आरोप करीत राहतात. पैशांची कामे अडली की शिवसेना नेते आंदोलने करतात. त्यांना सत्तेत काहीच किंमत नाही, असे ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना भाजप व शिवसेना नेते खोटे बोलत आहेत. फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ३३ हजार विहिरी या कागदावर असून कंत्राटदारांच्या खिशात पैसे गेल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मेक इन इंडियामध्ये गुंतवणुकीच्या आकडय़ांवर शून्ये वाढवून ती अनेक पटींनी फुगवून दाखविल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्वतंत्र विदर्भ हा संघ, भाजपचा अजेंडा

स्वतंत्र विदर्भ हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा असून अ‍ॅड. श्रीहरी अणे हे भाजपने पुढे केलेले मोहरे आहेत, असे सांगून महाराष्ट्रदिनी हुतात्मा स्मारक येथे फुलांची सजावट व रोषणाई न केल्याने भाजप व सेनेने जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.