27 January 2021

News Flash

महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं तो मतदारांचा अपमान-राज ठाकरे

राज ठाकरे यांचा भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर निशाणा

महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं तो मतदारांचा अपमान आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांवर राज ठाकरे यांनी टीका केली. आज कोणी कोणाला मतदान केलं? कोण कुठे सत्तेवर आहे? कोण कोणासोबत गेलं आहे? हे महिना दीड महिना महाराष्ट्राने खूप ऐकलं, खूप वाचलं. मतदारांची अशाप्रकारची प्रतारणा ही भाजपानेही केली आणि शिवसेनेनेही केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तर काही विचारायलाच नको असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“निवडणूक निकालानंतर एक चांगला भाग मला दिसला तो असा आहे की निवडणुकीसाठी म्हणून ज्यांनी पक्षांतरं केली होती त्यातले बरेचसे पडले. किंबहुना महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना पाडलं. अशा प्रकारचा धडा महाराष्ट्राच्या जनतेने शिकवला ते चांगलंच झालं” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ” सत्तेसाठी या पक्षांनी जी काही जनतेची प्रतारणा केली ती बाब दुर्दैवी आहे. अशा लोकांना जनतेने जागा दाखवली होती. मात्र पुढे आपल्या नशीबात हे असं वाढून ठेवलं जाईल हे जनतेला तरी काय ठाऊक होतं? एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जे घडलं त्यामुळे लोकांमध्ये नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर, मतदानावर होऊ शकतो ” असंही राज यांनी स्पष्ट केलं.

या सगळ्याबाबत तुमची राजकीय भूमिका काय असं विचारलं असता, ” माझी भूमिका मी घेतली आहे, यांच्या तंगड्यात तंगडं कोण घालणार? हे काही फार काळ चालणार नाही.”  असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यशाचे बाप खूप असतात आणि पराभवला सल्लागार

“२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्याआधी एक शरद पवार यांची एक सभा होती पावसातली ती एक सोडली तर २४ तारखेनंतर ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या काय होत्या? ‘बाप माणूस’, ‘ चाणक्य’ हे २३ ऑक्टोबरपर्यंत कुणीही म्हणत नव्हतं. २५ ऑक्टोबरपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे बोललं जातंय तेदेखील २३ तारखेपर्यंत बोललं जात नव्हतं. त्यामुळे यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात असं मी मानतो.” असंही राज यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जो शपथविधी घेतला त्याबाबत विचारला असता, जे काही त्यांनी केलं तेदेखील चुकीचं होतं असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका सोडून अशा गोष्टी ठरवल्यानंतर आपण चर्चा करण्यात काय अर्थ आहे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 11:42 am

Web Title: raj thackeray slams shivsena bjp congress ncp on maharashtra political crisis scj 81
Next Stories
1 फडणवीस सरकारच्या काळात बेसुमार पैसै वाटप : जयंत पाटील
2 बांगलादेश, पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकला – राज ठाकरे
3 नव्या वर्षापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार- अजित पवार
Just Now!
X