राज्याच्या परिवहन विभागाकडून येत्या काळात ७० हजार रिक्षा परवान्यांचे वाटप केले जाणार आहे. पण ७० हजार रिक्षा परवान्यांमध्ये ७० टक्के रिक्षा परवाने परप्रांतियांना वाटण्यात आले आहेत. मूळात मुंबईत या नव्या ७० हजार रिक्षांना पार्किंगसाठी जागा नसतानाही नव्या रिक्षा परवान्यांचे वाटप करण्याचे कारणच काय? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या परवान्यांच्या रिक्षा रस्त्यावर दिसल्या तर त्या जाळून टाका असा आदेश दिला आहे. पक्षाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राहुल बजाज यांच्या बजाज कंपनीच्या ७० हजार नव्या रिक्षांचा लॉट तयार असून, केवळ राहुल बजाज यांना फायदा व्हावा यासाठी फडणवीस सरकारने हा नव्या परवान्यांचा घाट घातल्याचा आरोप राज यांनी यावेळी केला. एका रिक्षाची किंमत १ लाख ७० हजार इतकी गृहित धरली असता ७० हजार रिक्षांसाठी सरकारचा एकूण ११९० कोटींचा राहुल बजाज यांच्या कंपनीसोबत करार झाला असल्याचे राज म्हणाले. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची घोषणाबाजी करणारे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर द्यावे नाहीतर नव्या रिक्षा रस्त्यावर उतरणार असतील तर रिक्षातील प्रवाशांना आणि चालकाला खाली उतरवून ती रिक्षा जाळून टाकण्यात येतील, अशी भूमिका राज यांनी मांडली.

दरम्यान, राज यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. सरकारमध्ये शिवसेनेचेही मंत्री आहेत. शिवसेनेला मराठी माणसाचा इतकाच जर पुळका असता तर परप्रांतियांना रिक्षाचे परवाने दिले गेलेच नसते. शिवसेनेला मराठी माणसाचा खोटा पुळका आहे, अशी टीका राज यांनी केली.

राज यांच्या भाषणातील मुद्दे-

  • प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात
  • खचून न जाता पुढे जायचं आहे.
  • मनातलं सगळं काही ८ एप्रिलला शिवतिर्थावर
  • लोकांना आंदोलनं करायला पाहिजेत
  • सरकामध्ये नुसते चेहरे बदलले काम तेच
  • राज्यात मराठी तरुणांनाच रिक्षा परवाने दिले गेले पाहिजेत.
  • न्यायाधीशांनी वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन पाहून निर्णय देऊ नयेत.
  • न्यायाधीशांनी त्यांच्या कक्षेत राहून निर्णय दिले पाहिजेत.
  • हजारो कोटी बुडवून श्रीमंत माणसं परदेशात पळतात कसे?
  • ७० हजार रिक्षाच्या परवान्यांमध्ये ७० टक्के परप्रांतियांना
  • बजाज कंपनीत सत्तर हजार रिक्षा तयार आहेत, राहुल बजाज यांच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी परवाने
  • नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या की जाळून टाका.
  • न्यायाधीश म्हणजे मोगलाई नाही.
  • मनसेने ४० हजार खोट्या रिक्षा परवान्यांचा पर्दाफाश केला.
  • राहुल बजाज यांच्या बजाज कंपनीला फायदा मिळावा म्हणून रिक्षा परवान्यांचे वाटप.
  • पुढची वाटचाल खडतर असली तरी ठाम आहे.
  • २३०० कोटी रुपये बेस्टने ग्राहकांकडून लुटले.
  • आपल्या पक्षाला जिथे जायचं आहे तिथे तुम्हा सर्वांना घेऊन जाणारच.