महाराष्ट्रातील राजकारणाचा अवघा पट बदलणारी, स्वत: विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली. या निवडणुकीत लोकांनी आपल्या बाजूने कौल दिल्यास नेतृत्वही करीन, असेही त्यांनी शनिवारी सभेत जाहीर केले. राज यांच्या या घोषणेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे अन्य सर्व पक्षांचे आडाखे आणि राजकीय समीकरणे बदलणार असून, निवडणुकीच्या राजकारणात चांगलीच रंगत येणार आहे. ही सभा संपताच या निर्णयाचा अर्थ आणि परिणाम यांबरोबरच ते मुंबईतून विधानसभा निवडणूक लढविणार की अन्य कोणत्या मतदारसंघातून, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे निवडणूक मैदानात उतरल्यास, तसे करणारे ते पहिले ठाकरे ठरतील.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर ‘या, मला आपल्याशी काही बोलायचं आहे.’ अशी साद राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना घातली होती. सोमय्या मैदानावर त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या सभेत ते मोठी चाल खेळणार असा कयास बांधला जात होता. आपल्या या खास ‘राज’कीय धक्कातंत्राचा त्यांनी पुन्हा एकदा अनुभव दिला. ‘तुम्ही व मी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन केला, लोकांची मने जिंकली तर लोक मत देतील. महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या बाजूने कौल दिला तर नेतृत्वही करेन,’ असे त्यांनी जाहीर करताच सभेत चैतन्याची लहर निर्माण झाली. सभेतील उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले.  लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र राज्यातील महायुतीच्या विजयाचे श्रेय महायुतीच्या उमेदवारांचे नाही, तर एकट्या नरेंद्र मोदी यांचे असल्याचे ठामपणे सांगून राज म्हणाले, की त्या पराजयानंतर आम्ही संपलो असे अनेकांना वाटले असले, तरी पराभवातूनही कसे पुढे जायचे याचे बाळकडू मी लहानपणापासूनच शिवसेनेकडून घेतलेले आहे. चेंडू जेवढ्या जोरात आदळतो, तेवढ्याच जोराने उसळी मारतो. तशी उसळी मी मारून दाखवेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापुढे त्याच त्याच, जुन्या विषयांवर मी कोणाशीही बोलणार नाही. केवळ यापुढे जे काही करायचे आहे, तेवढ्यापुरतेच बोलेन असे सांगत राज ठाकरे यांनी भूतकाळावर जणू फुली मारून नव्या वाटचालीचे संकेतही दिले.
नाशिक महापालिकेची मिळाल्यानंतर दोन वर्षांत मनसेने तेथे काय करून दाखविले, असे विचारता, मग ज्यांच्याकडे तीस वष्रे सत्ता आहे, त्यांना का हा प्रश्न विचारत नाही, असा सवालही त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात केला.
काय आहे याचा अर्थ?
*राज यांचा स्वत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय प्रस्थापित राजकारणाला धक्का बसणार आहे.
*राज यांनी स्वतच निवडणुकीस उभे राहण्याची घोषणा केल्याने महायुतीला राज यांच्या नेतृत्त्वाशी स्पर्धा करू शकेल असा उमेदवार जाहीर करावा लागेल. महायुतीला जागावाटपापासून सर्वच बाबींची फेरआखणी करावी लागेल.
*केंद्रातील विजयामुळे भाजपने शिवसेनेसमोर आक्रमक रूप धारण केले आहे. राजकीय फेरआखणीत शिवसेनेला नमविण्यात यश न आल्यास महायुतीची नवी समीकरणेदेखील जुळविण्याच्या हालचाली भाजपमधून सुरू होऊ शकतील.
*मनसेच्या उमेदवारांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा लाभ होतो, असे मागील निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. आता थेट महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यासमोरच राज ठाकरे यांनी शड्ड ठोकला आहे.
*पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच राज ठाकरे यांनी एवढी धाडसी खेळी केल्याने, मनसेच्या भविष्यकाळाची पावले त्यांनी विचारपूर्वक निश्चित केल्याचे मानले जाते. पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान आता राज यांच्यापुढे असेल. त्यामुळे स्वतचा मतदारसंघ निवडतानाही, त्यांच्या उमेदवारीच्या प्रभावामुळे आसपासच्या मतदारसंघांचे वारेही आपल्या पक्षाच्या बाजूने वाहील अशी काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे.
राज उवाच..
*नाशिकची सत्ता आली तेव्हा जवळपास ६५० कोटींच कर्ज महापिलकेवर होतं. ते कर्ज फेडून, आता महापालिकेचं उत्पन्न २०० कोटीनी वाढलंय. आम्ही काही करतोय, हे नाशिकमधली जनताच मान्य करेल..
*विधानसभेत बसलेल्यांनी टोलबद्दल काय केलं, ते त्यांना का विचारत नाही? पहिल्या आंदोलनात ६५ टोलनाके बंद झाले, हे कमी झालं?
*राहुल हे खरे म. गांधींचे अनुयायी.. काँग्रेस बरखास्त करा असं म. गांधी म्हणाले होते. राहुलनं ते करून दाखवलं.
*महाराष्ट्राच्या किंवा जनतेच्या विरोधात जेव्हा एखादी गोष्ट घडते, तेव्हा खळ्ळ खटॅक करावं, अस धोरण. मी सांगेन तेव्हाच ते करायचं. व्यक्तिगत गोष्टींसाठी नाही.
प्रतिक्रिया
काँग्रेसचा टोल
लोकशाहीवर विश्वास नसलेल्या ठाकरे कुटुंबातून कोणीतरी प्रथमच निवडणूक लढवणार असे जाहीर करत आहे. राज ठाकरे यांना शुभेच्छा, अशी तिरकस प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली.
भाजपकडून स्वागत
लोकशाहीत निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सर्वाचेच स्वागत आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता विधानसभा निवडणुकीत महायुतीला आपला कौल देणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Vasant More secretly went to the Collectors office on Friday and filed his candidature
वसंत मोरे गुपचूप आले, उमेदवारी अर्ज भरून गेले
Ajit Pawar, sunetra pawar
दुभंगलेली मने जोडण्यावर अजित पवारांचा भर
BJPs charsau paar slogan is a conspiracy to change the constitution MLA Praniti Shinde alleges
भाजपचा ‘चारसौ पार’चा नारा म्हणजे संविधान बदलण्याचे कारस्थान, आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप
Harshwardhan jadhav
“मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव आमदार”, हर्षवर्धन जाधव लढवणार लोकसभा निवडणूक; पण कोणत्या पक्षातून?