परप्रांतियांना मुंबईत घरे मिळतात, परंतु अग्निशमन दलातील मराठी अधिका-यांना मुंबईत कायमस्वरूपी घरे का मिळत नाहीत? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. काळबादेवी येथील गोकुळ हाऊसला लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन यांची ऐरोली येथील बर्न रुग्णालयात राज ठाकरे यांनी मंगळवारी भेट घेतली.
महानगरपालिकेच्या खात्यामध्ये हजारो कोटी रूपये जमा आहेत. मात्र, त्या पैशांचा लोकांना काहीच उपयोग होत नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना असं वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यामुळे त्यांचा विमा उतरवण्याबाबत आणि घरासंदर्भात मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
शनिवारी आगीत जखमी झालेल्या सुधीर अमिन यांच्यावर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे उपचार सुरू आहेत. ८० टक्के भाजलेल्या अमिन यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांना श्वास घेण्यात अडचण येत आहे.
काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या संजय राणे आणि महेंद्र देसाई यांच्या कुटुंबीयांना बृहन्मुंबई महापालिकेकडून आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार आहे.