News Flash

कोस्टल रोडवरुन राज ठाकरे आक्रमक, कोळीवाड्यांना भेट देणार

शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं 16 डिसेंबरला भूमिपूजन होणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

कोस्टल रोडवरुन शिवसेना आणि मनसे आमने सामने येणार असल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं 16 डिसेंबरला भूमिपूजन होणार आहे. समुद्रात भराव टाकून हा मार्ग तयार होत असल्याने कोळी समाज व पर्यावरणप्रेमींकडून या प्रकल्पाला विरोध होत आहे. कोळी समाजाकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोळीवाड्यांत जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कोस्टल रोडवरुन शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पश्चिम उपनगरांमध्ये जलदगतीने पोहोचता यावे या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सागरी सेतूच्या वरळी येथील टोकापर्यंतच्या कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटींचा खर्च येणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २०१० मध्ये तत्कालीन राज्य सरकारने किनारा मार्ग उभारण्याची सूचना पालिकेला केली होती. या प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिणेकडील टोकापर्यंतचे ९.९८ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. या कामासाठी १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. या कामाच्या खर्चात वाढ झाल्याबद्दल स्थायी समिती सदस्यांनी ताशेरे ओढत हा प्रस्ताव राखून ठेवला होता.

मात्र प्रकल्पाच्या खर्चातील एकूण रकमेपैकी अनुक्रमे ४ हजार ३०२ रुपये विविध शुल्कांपोटी, तर एक हजार ७०० कोटी रुपये करापोटीपोटी भरावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली होती.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे. या प्रकल्पनांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत ९.९८ किलोमीटर लांबीच्या या कोस्टल रोडचे काम महापालिकेमार्फत होणार आहे.

या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरापर्यंतच्या मुंबईकरांच्या प्रवासात सुमारे ७० टक्के वेळेची व ३४ टक्के इंधन बचत होणार आहे. त्याचबरोबर ध्वनी व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा पालिकेचा दावा आहे. कोस्टल रोडची एकूण लांबी ९.९८ किमी एवढी आहे. तर आंतरबदलांसहीत ही लांबी सुमारे २४ कि.मी. एवढी असणार आहे.

कामाचे वाटप
* प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान – एल अ‍ॅण्ड टी (४२२० कोटी रुपये)
* प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस – एल अ‍ॅण्ड टी (५२९० कोटी रुपये)
* बडोदा पॅलेस ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक – एचसीसी – एचडीसी (३२११ कोटी रुपये)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 11:32 am

Web Title: raj thackeray to meet fisherman over coastal road project
Next Stories
1 सायनमध्ये १७ दुचाकी जाळल्या
2 शाळांमध्ये नाटय़शिक्षण सक्तीचे व्हावे – मनोज वाजपेयी
3 ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ कोण ठरणार?
Just Now!
X