राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून नऊ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता तर नाडलेल्या या संतप्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी थेट संपाचे हत्यार उपसले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेऊन केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मदत करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधानांना एका पत्राद्वारे करणार असल्याचे राज यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.

राज्यात एक कोटी ३४ लाख शेतकरी असून, यातील नव्वद लाख शेतकरी हे नियमित कर्ज फेडत आहेत, तर ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर येताच पंधरा दिवसांत कर्जमाफीची घोषणाही केली. महाराष्ट्रातही सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची, तसेच स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची घोषणा भाजपने केली आहे. तथापि, गेल्या अडीच वर्षांत या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली नसून राज्याची रिकामी असलेली तिजोरी पाहता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे राज्याला परवडणारे नाही. अशावेळी केंद्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आर्थिक मदत केली पाहिजे, अशी राज यांची भूमिका आहे. ३० लाख शेतकऱ्यांना ३१ हजार पाचशे कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची गरज आहे.

मुंबई व महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक कर मिळतो. तसेच कृ षी उत्पादनातही महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. हे लक्षात घेता केंद्र शासनाने हा आर्थिक भार उचलला पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रात राज घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील शेतीपंपांना वीजजोडणी, सिंचनासाठी ठोक मदतीपासून कृषी उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट हमी भाव देण्याची जी घोषणा पंतप्रधानांनी केली होती, त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्रापासून करण्यात यावी, अशी मागणीही केली जाणार आहे. अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला पाहिजे, अशीही मनसेची भूमिका आहे.

शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आज भेटणार

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काल पुणतांबे गावी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकरी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर नांदगावकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मनसेच्या सहभागाबाबत राज यांच्याशी चर्चा केली. याबाबत राज यांना विचारले असता आज, सोमवारी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ कृष्णकुंज येथे भेटण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संप फोडण्याचा उद्योग मुख्यमंत्र्यांकडून केला जात असून संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहिले पाहिजे, असेही राज म्हणाले.