मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाचित्राच्या माध्यमातून भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून हे रेखाचित्र साकारून आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टवर पोस्ट केले आहे. मेरे प्यारे भारतवासीयो! आपका नम्र अटलबिहारी वाजपेयी असं एका कागदावर एक हात लिहिताना दिसतो आहे. त्याच्या शेजारीच एक महाकाव्य संपले असा मथळा देऊन हे रेखाचित्र साकारण्यात आले आहे.

अटल बिहारी वाजपेयी हे कवी, साहित्यिक आणि उत्तम समाजकारणीही होते. कुशल राजकारणीही होते, त्यांच्या कविता आजही अनेकांसाठी आदर्श आहेत. त्यांच्या आयुष्याला महाकाव्याची उपमा देऊन राज ठाकरेंनी हे रेखा चित्र साकारले आहे. सोशल मीडियावर या रेखाचित्राला अनेक लाईक्स मिळत आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी निधन झाले. त्यानंतर सगळा देश हळहळला. आज त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील स्मृती स्थळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह उपस्थितांना अश्रू अनावर झाले. एक पितृतुल्य व्यक्ती आपल्यातून कायमची निघून गेली या भावनेने आणि जड अंतःकरणाने अटल बिहारी वाजपेयींना देशाने निरोप दिला. यानंतर काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाचित्राच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली.