महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश मारियांच्या कार्यालयात जाऊन बुधवारी त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पोलिस मुख्यालयात जाऊन राकेश मारियांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांशी अर्धा तास चर्चा केली. मागील आठवड्यात टोल आकारणीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी राज्यव्यापी रास्तारोकोची हाक दिली होती. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. टोलच्या निषेधार्थ पुकारलेल्या या आंदोलनात राज ठाकरेंना काही काळासाठी अटक करून नंतर सोडून देण्यात आले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर राज ठाकरेंनी आपले आंदोलन मागे घेतले होते. राकेश मारियांनी रविवारी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर मुंबईतील रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येतील, असे जाहीर केले आहे.