पक्षात मी आतापर्यंत खूप लोकशाही पाळली, मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी आपल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी नगरसेवकांना तंबी दिली.

तुम्ही पैशासाठी दुसऱ्या पक्षात जात असाल, तर ते सारे क्षणिक आणि व्यर्थ आहे. तुमच्या काही समस्या असतील तर त्या थेट माझ्याकडे मांडा, मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे, असे राज ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांना सांगितल्याचे कळते.

गेल्या महिनाभरात मनसेचे तीन नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. नाशिकमध्येही मनसेच्या काही नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई पालिकेत मनसेचे २७ नगरसेवक होते. त्यापैकी आता फक्त २२ नगरसेवकच पक्षात उरले आहेत. नुकतेच ईश्वर तायडे यांच्यापाठोपाठ मनसेचे नगरसेवक सुरेश आवळे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला लागलेली गळती थांबविण्याच्या दृष्टीने राज प्रयत्न करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते.