दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील नवीन रिक्षा जाळा, असा आदेश कार्यकर्त्यांना देणाऱ्या राज ठाकरे यांनी शुक्रवारी हे आंदोलन तूर्त स्थगित करीत असल्याचे जाहीर केले आणि पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही हिंसक कृती करू नये, असे आदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले.
मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त ९ मार्च रोजी पक्षाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मुंबईतील नव्या रिक्षांचा मुद्दा उपस्थित केला होता. राहुल बजाज यांच्याकडील रिक्षा बाजारात आणण्यासाठी हा सगळा घाट घातला जात असल्याचा आरोप करून मुंबईमध्ये नव्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यानंतर त्यातील प्रवाशांना आणि चालकाला खाली उतरवून त्या जाळून टाकण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरे यांच्या या हिंसक आदेशाचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. अनेकांनी या आदेशाचा तीव्र शब्दांत निषेध करीत राज ठाकरे यांना खडे बोल सुनावले होते. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांचा मुद्दा उचलून धरणाऱ्या नेटिझन्सनी या आदेशाचा विरोध करीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राज ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि पराभवातून शिकले पाहिजे, असे म्हटले होते.
विधीमंडळाच्या अधिवेशनातही या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. अनेक सदस्यांनी या वक्तव्याचा निषेध केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रिक्षा जाळा आंदोलन तूर्त स्थगित करीत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. तसे आदेश त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांना दिले आहेत.