सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यावरुन हिंदी चित्रपटसृष्टीत जो वाद उसळला आहे त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी?
“सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद”

आपला नम्र
राज ठाकरे

काय आहे प्रकरण?

सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण हिंदी सृष्टी हळहळली. मात्र त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांवर कसा अन्याय होतो. घराणेशाही कशी चालते याबाबत अनेक लोकांनी भाष्य करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री कंगना रणौतने या सगळ्या घराणेशाहीच्या प्रकाराला एक प्रकारे वाचा फोडली. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही व्हिडीओ पोस्ट केले. त्या व्हिडीओत सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचाही दावा तिने केला.

करण जोहर, सलमान खान आणि इतर दिग्गज कलाकारांनी सुशांत सिंह राजपूतवर अन्याय केल्याचंही बोललं गेलं. अशा सगळ्या वादात काही बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामध्ये कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली. या सगळ्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत भूमिका मांडली आहे. ज्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येमुळे निर्माण झालेल्या वादाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा किंवा पक्षाच्या कुठल्याही शाखेचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलं आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची या वादावरची प्रतिक्रिया समोर आली आहे.