महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांची पेडर रोड येथील घरी जाऊन भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे राज यांनी म्हटले आहे. मात्र, या भेटीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे.

मनसेचा उद्या पाडवा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. तत्पूर्वी राज यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या भेटीचे महत्व वाढले आहे. बंद दाराआड तब्बल ४५ मिनिटे झालेल्या या चर्चेचा नेमका तपशील मिळू शकलेला नसला तरी या भेटीनंतर राज ठाकरे उद्याच्या मेळाव्यात महत्वाची घोषणा करु शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची महामुलाखत घेतली होती. त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, या मुलाखतीनंतर शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळेच आपण आज खास त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी त्यांच्या घरी गेल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.