महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि पर्यायाने मनसेचा वाढता प्रभाव लक्षात घेता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पराभवासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय युतीत राज ठाकरे यांना सहभागी करून घेण्याची अपरिहार्यता तीनही घटकांनी मान्य केली आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून आगामी लोकसभा निवडणुकांत मुंबईतील सहा जागा सेना-भाजप आणि मनसे या पक्षांनी समप्रमाणात वाटून घेण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. नंतरच्या राज्य विधानसभा निवडणुकांत मनसेला मोठेपणाची भूमिका देऊन या संभाव्य युतीची किंमत चुकवावी लागणार असल्याने त्यासाठी शिवसेनेस राजीही करण्यात आले आहे.
उद्धव व राज यांनी एकत्र यावे किंवा किमान निवडणुकीत तरी समझोता करावा, अशा तीव्र भावना बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसैनिक व मनसैनिकांमधूनही व्यक्त होत होत्या. उद्धव ठाकरे यांनी जानेवारीत ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत, मनसेशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. एका हाताने टाळी वाजत नाही, असे सांगत चर्चेसाठी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष सादही घातली. त्यावर, एकत्र येण्याची चर्चा वृत्तपत्रातून होत नसते, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केल्याने, उद्धव यांचा एकत्र येण्याचा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळला नाही, असा राजकीय अर्थ लावला जात आहे. दोघांच्या या सूचक प्रतिक्रियांनंतर त्यांनी परस्परांवर टीका करण्याचेही टाळलेच, उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडवट टीका करणाऱ्या राज यांचेच उद्धव यांनी जाहीर समर्थन केले. हेसुद्धा एक नवे राजकीय समीकरण आकारास येण्याचे संकेत मानले जात आहेत.  राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या वाटपाबाबत काही अनौपचारिक चर्चा सुरू असल्याचे कळते. मागील निवडणुकीत फक्त प्रिया दत्त यांच्या मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघाचा अपवाद वगळला तर केवळ सेना-मनसेमधील मतविभाजानामुळे चार जागा काँग्रेसला व एक राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाली. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत सेना, मनसे व भाजपने प्रत्येकी दोन जागा लढवाव्यात अशी चर्चा आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा राज यांना विरोध असला, तरी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न होणार आहेत. संभाव्य महायुतीत आपली सौदेबाजीची ताकद वाढविण्यासाठी राज यांचे सध्या राज्यभर गर्दीखेच दौरे सुरू असल्याचे बोलले जाते.   

विशाल युतीने सत्ताबदल शक्य  
मधु कांबळे, मुंबई<br />आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना, मनसे, भाजप आणि रिपब्लिकन पक्ष अशी विशाल युती झाल्यास महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन घडू शकेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्रित फारसा प्रभाव पाडू न शकलेल्या महायुतीत मनसेचा समावेश झाला तर, काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्ता राखण्याचे आव्हान खडतर होणार आहे.
विरोधी पक्षांमधील विस्कळीतपणाचा फायदा घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सलग तीन वेळा राज्याची सत्ता हाती घेतली. विरोधी पक्षांमध्ये अद्यापही आव्हानात्मक एकोपा नसल्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही आपणच बाजी मारू अशा तोऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते वावरत आहेत. वास्तविक लोकांनाही आघाडीच्या निष्क्रिय सरकारचा कंटाळा आला आहे. परंतु त्यांना सक्षम पर्याय दिसत नाही. सेना-मनसे-भाजप-आरपीआयने ताकदवान पर्याय देण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात तरी सत्ताबदल अटळ आहे, असे मानले जात आहे.   अगदी अल्पावधीतच मनसेने मैदानात आणि मतपेटीतही गर्दी जमविण्यात यश मिळविले आहे. अर्थात त्याचा मागील निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसलाच चिकार फायदा झाला. मनसेचा जन्म झाला नसता तर मुंबईतील लोकसभेची फक्त प्रिया दत्त यांची एकच जागा काँग्रेसला मिळू शकली असती.
त्या पाश्र्वभूमीवर सेना-मनसे-भाजप-आरपीआय एकत्र आले तर, काँग्रेसच्या मुंबईतील वर्चस्वाला हादरा बसू शकतो. या चार पक्षांना एकत्र येण्यास तशी आता फारशी अडचण नाही, अशी चर्चा आहे.

संभाव्य मतदारसंघ वाटप
शिवसेना : मुंबई उत्तर-पश्चिम व मुंबई उत्तर-मध्य
मनसे : मुंबई दक्षिण-मध्य आणि ईशान्य मुंबई
भाजप : दक्षिण मुंबई व उत्तर मुंबई