24 February 2021

News Flash

‘कबरची खबर!’ ज. लोया प्रकरणावर राज ठाकरे यांचे नवे व्यंगचित्र

ज. लोया प्रकरणावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता जस्टिस लोया यांच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य करणारे व्यंगचित्र त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहे. जस्टिस लोया प्रकरणावर चपखल भाष्य करणारे हे व्यंगचित्र आहे. एक भलामोठा कुत्रा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मागे धावतो आहे. या कुत्र्याच्या पाठीवर ‘सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेली शंका’ असे लिहिले आहे. त्यानंतर अमित शहा या कुत्र्याला घाबरून पळत आहेत. मधे एका कबरीतून एक हात वर आला आहे. या कबरीच्या बाजूलाच गाडले गेलेले ज.लोया प्रकरण अशी पाटी लावण्यात आली आहे. ज. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावर काढलेले अत्यंत समर्पक व्यंगचित्र असेच या व्यंगचित्राचे वर्णन करता येईल.

१ डिसेंबर २०१४ रोजी नागपुरात न्या. बी. एच. लोया यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला अशी माहिती पुढे आली होती. न्या. लोया हे त्यावेळी सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी करत होते. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेही नाव समोर आले. या प्रकरणाचा न्या. लोया यांच्यावर दबाव होता अशी माहितीही समोर आली होती. आता हे प्रकरण कसे लांबणीवर पडले होते आणि चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतल्यावर ते पुन्हा चर्चेत कसे आले. त्यानंतर अमित शहांची धाकधूक कशी वाढली हे सारे काही राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून रेखाटले आहे.

हे प्रकरण काहीसे मागे पडले होते. असे असले तरीही सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चार न्यायाधीशांनी बंड पुकारले होते. या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन न्या. लोया मृत्यू प्रकरणाची तातडीने चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली. त्यानंतर आता याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढले आहे. याआधी कोरेगाव भीमा प्रकरण, उद्धव ठाकरे यांचा सत्तेतील सहभाग, गुजरात निवडणूक निकाल, हज अनुदानचा निर्णय या संदर्भातल्या घडामोडींवर राज ठाकरे यांनी त्यांची व्यंगचित्रे पोस्ट केली आहेत. आता ज. लोया प्रकरणावर आणि चार न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाष्य करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 9:38 pm

Web Title: raj thakre post his new caricature of justice loya case and press conference of four judges
Next Stories
1 जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीविरोधात आरोपपत्र दाखल
2 काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रगीताऐवजी खरंच वाजली का संघाची प्रार्थना?
3 पतीने पोस्टाने पाठवला ‘ट्रिपल तलाक’ पत्नीची पोलिसात धाव
Just Now!
X