02 March 2021

News Flash

झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची भूमिका

झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे

संग्रहित छायाचित्र

मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करतो आहे. मूक मोर्चे काढून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. बुधवारी मुंबई ठाण्यात बंद पाळण्यात आला. तर मंगळवारी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये बंदचे आणि आंदोलनाचे पडसाद उमटले. या आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्राण गमावला. यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झाले. मराठा समाजाच्या बांधवांसह सगळ्याच मराठी बांधवांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. हे पत्र राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहे. तुम्हाला झेपत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारला इशाराही दिला आहे. मराठा तरूण शांततेच्या पद्धतीने आंदोलन करत होते इतके मोर्चे निघाल्यावरच हा प्रश्न सुटायला हवा होता असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी नेमके काय म्हटले आहे?

महाराष्ट्रातील माझ्या भावा-बहिणींना आवाहन आणि सरकारला इशारा

मराठा मूक-क्रांती मोर्चाचं ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केलं होतं. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असंही म्हटलं होतं. काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडलं. अर्थात असं असलं तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही ‘मराठी’, मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला ‘मराठी’ म्हणून ते परवडणारे नाही.

एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक “मराठा समाज” म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले.

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून. जी बाहेरची माणसं महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पहातात त्यांच्याकडून. आपले शिवाजी महाराज म्हणाले होते की “हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा”, आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: “आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तो परप्रांतीयांची इच्छा”. त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची ! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.

सरकारला  इशारा
सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. नाहीतर आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची. दुसरं असं की सरकारला “शांतता आणि सुव्यवस्था” सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसतं आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासनं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचं कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे. वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 1:49 pm

Web Title: raj thakreys facebook post about kakasaheb shinde and maratha morcha
टॅग : Maratha Kranti Morcha
Next Stories
1 मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन
2 मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढू: रवी राणांचा इशारा
3 विकृतीचा कळस: मुंबईत प्रवाशाने लाथ मारल्याने ट्रॅकमनचा मृत्यू
Just Now!
X