शेतकऱ्यांची फसवणूक करत त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नये असे म्हणत राज ठाकरे यांनी दिवाळीतले त्यांचे पाचवे व्यंगचित्र सादर केले आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनाही साडी नेसलेल्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. साडी नेसून हे दोघेही शेतकऱ्याला ओवाळायला आले आहेत. शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला खडसावून सांगते आहे आज पाडव्याची एका दमडीचीही ओवाळणी यांना टाकलीत तर याद राखा असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ, कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून असे आश्वासन देत हे सरकार सत्तेवर आले मात्र या सरकारने सातत्याने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. दुष्काळ, कर्जबाजारीपणा ही संकटे होतीच.त्यामुळे या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही मोठ्या प्रमाणावर झाल्या. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन हे सरकार पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ओवाळेल तुमच्याकडे मतांची ओवाळणी मागेल मात्र त्यांना एक दमडीही देऊ नका असे राज ठाकरेंना या व्यंगचित्रातून सुचवायचे आहे.

धनत्रयोदशीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही ठिकाणी त्यांचे व्यंगचित्र पोस्ट करत आहेत. अमित शाह, नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांवर व्यंगचित्र काढून झाल्यावर आता महाराष्ट्र सरकारवर म्हणजेच भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांना हे व्यंगचित्र चांगलेच झोंबण्याची शक्यता आहे.