|| रसिका मुळ्ये

तीन वर्षांपूर्वी नूतनीकरण करूनही ग्रंथालयात तळे

मुंबई विद्यापीठातील सर्व स्तरावरील गोंधळ सावरण्यात गुंतलेल्या प्रशासनाचे इतर अनेक प्रश्नांप्रमाणेच इमारतीच्या डागडुजीकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. राजाभाई टॉवरच्या नूतनीकरणानंतरही अद्याप तेथील वाचनालयाची अवस्था सुधारलेली नाही. शहरात दोन दिवस झालेल्या पावसानंतर राजभाई टॉवर येथील वाचनालयात तळे साचले.

राजाभाई टॉवरमधील ग्रंथालय ही विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याची जागा. वसतिगृहात राहणारे विद्यार्थी ग्रंथालयाच्या रिडींग हॉलचा अभ्यासासाठी उपयोग करतात. मात्र ऐतिहासिक वारसा असलेल्या या इमारतीतील ग्रंथालयाकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने या वाचनालयाची दुरावस्थाही समोर आली आहे. राजाभाई टॉवरमध्ये वाचनालय आहे, तर त्याला जोडून असलेल्या इमारतीमध्ये ग्रंथालय आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या राजाभाई टॉवरमधील वाचनालयाचे छत अनेक ठिकाणी गळत आहे. खिडक्यांतूनही इमारतीत पाणी शिरल्यामुळे मुख्य वाचनालयात सोमवारी चक्क तळे साचले होते. काही ठिकाणी भिंतीवरही पाण्याच्या धारा लागल्या होत्या. विद्यापीठाच्या प्रशासनाने साचलेले पाणी मंगळवारी सकाळी आल्यावर साफ केले. मात्र मंगळवारीही इमारतीतील गळती कायम होती. त्यातच इमारतीत अनेक उघडय़ा विद्युत वाहिन्यांचीही भर आहे. पुस्तकांच्या कापाटांवरही पाणी गळत आहे. या इमारतीत सर्व पुस्तके नसली तरी अनेक दुर्मीळ ग्रंथांची कपाटे, पीएच.डीचे प्रबंध आहेत. त्याचप्रमाणे इमारतीच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणावर लाकडाचा वापर करण्यात आला आहे. ते देखील पावसाने भिजते आहे.

अवघ्या तीनच वर्षांपूर्वी (२०१५) राजाभाई टॉवरचे आणि नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी या इमारतीसाठी साधारण चार कोटी रुपये खर्च करण्यात आला. एवढा खर्च करूनही इमारतीची ही अवस्था कशी झाली, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.