कुलगुरूपदासाठी लागणाऱ्या पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळे नियुक्तीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर अखेर सोमवारी आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या स्तुतीसुमनांच्या वर्षांवातच पदावरून समारंभपूर्वक पायउतार होत ‘माजी’ झाले; मात्र विद्यापीठापासून जवळच असलेल्या सह्य़ाद्री अतिथिगृहात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून अभिनंदनपर पुष्पगुच्छ स्वीकारणारे विद्यापीठाचे ‘आजी’ कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी या सोहळ्याला हजर राहण्याचे जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे या कार्यक्रमात माजी कुलगुरूंच्या ‘निरोपा’ऐवजी सर्वाधिक चर्चा रंगली होती ती आजी कुलगुरूंच्या न झालेल्या स्वागताचीच!
मुंबई विद्यापीठाचे मावळते कुलगुरू वेळूकर यांच्या निरोपाची, तर नव्यानेच कुलगुरूपदी नियुक्ती झालेल्या डॉ. देशमुख यांच्या स्वागताची संधी सोमवारी दीक्षांत समारंभात आयोजिण्यात आलेल्या एकाच कार्यक्रमात साधण्यात आली होती. प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी विविध संघटनांनी पुढाकार घेऊन आयोजिलेल्या या जंगी सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर देशमुख यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र दुपारी चारच्या सुमारास आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमाला हजर राहण्याचे प्रा. देशमुख यांनी टाळल्याची चर्चाच या कार्यक्रमात सर्वाधिक रंगली होती.
चर्चगेटच्या दीक्षांत सभागृहापासून काही अंतरावर असलेल्या मलबार हिल येथील सह्य़ाद्री अतिथिगृहात तावडे यांनी सोमवारी सकाळीच कुलगुरूंच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचवेळी वेळूकर यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी तावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर पुढील पाच वर्षे त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमाला देशमुख यांनी हजर राहण्याचे टाळले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. देशमुख उपस्थित राहणार नसल्याचे आयोजकांनी जाहीर केले तेव्हा सर्वाच्याच भुवया उंचावल्या. प्रा. देशमुख यांच्या अनुपस्थितीमुळे मग वक्त्यांची भाषणे केवळ वेळूकर यांच्या निरोपावरच केंद्रित झाली. वेळूकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेल्या प्राचार्य, अधिष्ठाता यांनी त्यांच्यावर अक्षरश: स्तुतीचा वर्षांव केला. काहींनी त्यांच्या फोन न घेण्याच्या सवयीवरही जाताजाता हलकासा चिमटा काढला. कोट-टायऐवजी साधा पेहराव करण्याची, घरच्या जेवणाची सवय, सतत हसमुख असलेला चेहरा अशा वेळूकर यांच्या किती तरी वैशिष्टय़ांवर यावेळी प्राचार्य व अधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. वेळूकरांचा कार्यकाळ हा खऱ्या अर्थाने ‘लर्निग प्रोसेस’ कसा होता, त्यांच्यामुळे विद्यापीठाचा दर्जा कसा वधारला, नवे अभ्यासक्रम कसे सुरू झाले, परीक्षा विभागाचा कारभार कसा सुधारला, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करीत वक्त्यांनी आपल्या मावळत्या कुलगुरूंना पुढील वाटचालीसाठी अभिष्ट चिंतले. काही वक्त्यांनी तर उत्साहाच्या भरात वादग्रस्त कारकीर्दीबद्दल वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांचा उल्लेख करीत प्रसारमाध्यमांनाच वेळूकर यांना  ‘विकासाचे शत्रू’ ठरवून टाकले होते.