प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाईची मागणी

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला पालिका रुग्णालयात तब्बल चार महिने आश्रय दिल्या प्रकरणावरून आरोग्य समितीच्या मंगळवारच्या बैठकीत गोंधळ उडाला. पालिका रुग्णालये गुन्हेगारांना आश्रय देणारी केंद्रे बनू नयेत यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल करीत बैठक तहकूब केली. तसेच पालिका सर्वसाधरण उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेला एक आरोपी गेले चार महिने राजावाडी रुग्णालयात दाखल असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी आरोग्य समितीच्या मंगळवारच्या बैठकीत निदर्शनास आणून दिली. ही बाब आपल्याला माहीत असल्याची कबुली बैठकीस उपस्थित असलेले पालिका सर्वसाधारण उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक महेंद्र वाडीवाला यांनी दिली. त्यामुळे नगरसेवकांच्या संतापात भर पडली.

पालिका रुग्णालये गुन्हेगारांची आश्रयस्थाने बनू लागल्याचा आरोप नगरसेवकांनी या वेळी केला. या मुद्दय़ावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. रस्ते घोटाळाप्रकरणी रस्ते विभागाच्या तत्कालीन प्रमुख अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहिती असतानाही कोणतीही कारवाई न करणारे महेंद्र वाडीवाला यांना निलंबित करावे, अशी मागणी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी केली. अखेर सईदा खान यांनी बैठक झटपट तहकूब करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा दिल्यामुळे आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम यांनी बैठक तहकूब केली.