डॉक्टरकडून वारंवार परिचारिकेस दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीचे पडसाद शुक्रवारी राजावाडी रुग्णालयात उमटले. संबंधित डॉक्टरविरुद्ध रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. त्यात परिचारिकांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते.
या प्रकरणी चौकशी करुन डॉक्टर दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन रुग्णालयीन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
राजावाडी रुग्णालयातील डॉक्टर गेले काही दिवस एका परिचारिकेला वारंवार त्रास देत होता. या डॉक्टरने गुरुवारी परिचारिकेला शिवीगाळही केली आणि रुग्णालयातील वातावरण तापले. कामगार संघटनांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि शुक्रवारी सकाळी ९ वाजता राजावाडी रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ च्या सुमारास कामगार संघटनांचे प्रतिनिधीचे शिष्टमंडळ रुग्णालय प्रशासनाच्या भेटीला गेले.परिचारिकेला शिवीगाळ करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करण्यात येईल. चौकशीमध्ये डॉक्टर दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आल्यानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती म्युनिसिपल कामगार, कर्मचारी सेनेचे सुनील चिटणीस यांनी दिले.