News Flash

राजगृह तोडफोड प्रकरण: नेत्यांनी नोंदवला निषेध

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी अज्ञातांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर आता राज्यातील नेतेमंडळीनी या घटनेचा निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

“राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.  मुंबईतील दादर या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. पवित्र वास्तूची अशी तोडफोड होणे संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा निषेध.” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी निषेध नोंदवला आहे.

“दादर येथील राजगृह या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी जो हल्ला केला तो निषेधार्ह आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल” असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. “विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांचे मुंबई निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. मी सदर घटनेचा निषेध करतो” असं पटोले यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान ही आमची अस्मिता आहे. माथेफिरुंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे मी या घटनेचा तीव्र निषेध करतो” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवला आहे. “परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान आहे, नागरिकांच्या भावना राजगृहाशी जोडलेल्या आहेत. या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध.” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी केलं शांततेचं आवाहन

“मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

ही घटना समजताच तातडीने नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेमागे कोण आहे याचा तपास आता पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:39 am

Web Title: rajguruha vandalism case maharashtra ministers and leader posted their reaction on twitter scj 81
Next Stories
1 मालेगावची धाकधूक पुन्हा वाढली
2 कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
3 सातपुडय़ात दुर्मिळ ‘निलमणी आमरी’ वनस्पतीचे अस्तित्व
Just Now!
X