खासदार राजू शेट्टी यांची घोषणा

देशातील शेतकऱ्यांना कायद्याने कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी देशभर जनजागृती आणि आंदोलन करण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्याची सुरुवात मध्य प्रदेशातून करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने दिल्लीत २० व २१ नोव्हेंबर रोजी किसान मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या काही विधवा हजर होत्या. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. शेतकऱ्यांची या दुष्टचक्रातून मुक्तता करण्यासाठी काही तरी करा, अशी मागणी त्यांनी त्या वेळी केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी खासगी विधेयके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे शेट्टी यांनी सांगितले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. त्यातून त्याची सुटका करण्यासाठी कर्जमाफीचा कायदा करण्याची संघर्ष समितीची मागणी आहे. त्यासाठी समितीच्या वतीने खासगी विधेयक तयार करण्यात आले आहे.