राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीसाठी आदेश

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत होणारे गैरवापर टाळण्याकरिता निवडणूक आयोगाने मतदानपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिण्यासाठी कोणत्या रंगाचे किंवा विशिष्ट पेन वापरावे, असा आदेश काढला आहे. कारण हरयाणामध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मते वेगळ्या पेनाने पसंती क्रमांक लिहिले म्हणून बाद ठरविण्यात आली होती. यावरून बराच वाद झाला. मते बाद ठरविण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत विशिष्ट पेन वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशिष्ट पेनने मतदान केल्याने गैरप्रकारांना आळा बसेल का, हा खरा प्रश्न आहे.

विधान परिषद निवडणुकीत कशा प्रकारे मतदान होते?

विधान परिषद निवडणुकीच्या मतपत्रिकेत पसंती क्रमांक लिहायचा असतो. विधानसभेतून आठ किंवा दहा उमेदवार निवडून द्यायचे असतात तेव्हा जेवढय़ा जागा तेवढे पसंती क्रमांक लिहावे लागतात. हे क्रमांक निवडणूक आयोगाकडून देण्यात येणाऱ्या पेनाने लिहावेत, अशी अपेक्षा असते.

गैरप्रकार कसे होतात?

मतांची फाटाफूट टाळण्याकरिता प्रत्येक उमेदवार खबरदारी घेत असतात. नेमके कोणाला मत दिले हे समजावे म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या जातात. यासाठी विशिष्ट रंगाचे पेन दिले जातात किंवा रकान्यात कोठे एक आकडा लिहायचा हे ठरवून दिले जाते. अलीकडेच एका मतदारसंघात उमेदवाराने कॅमेरा असलेली पेन मतदारांना दिली होती. प्रत्येकाने मतदान केंद्रात गेल्यावर चेनच्या मागे असलेल्या कॅमेरात कोणाला मत दिले याचा फोटा काढण्याचे आपल्या मतदारांना बंधनकारक केले होते. काही वेळा मोबाइलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढण्यास सांगण्यात येते, पण मतदान केंद्रात मोबाइलच्या वापरावर बंधने आल्याने कॅमेरे असलेली चेनची पेन मतदारांना देण्यात आली होती.

निवडणूक आयोगाचा तोडगा?

हरयाणामध्ये राज्यसभा निवडणुकीत झालेला गोंधळ किंवा अन्य राज्यांमध्ये उमेदवारांकडून होणारे वेगवेगळे उद्योग लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतदानासाठी कोणते पेन वापरावे याचा आदेशच काढला आहे. यानुसार जांभळ्या रंगाचे स्केच पेन वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मतदाराला मतदान केंद्रात जाताना हे पेन देण्यात यावे आणि बाहेर पडताना ते काढून घेण्यात येणार आहे. कारण ठरावीक पेन आत गेल्यावर आधीच्या मतदाराकडून दुसऱ्या मतदाराला दिले जाते. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले पेन वापरता येईल. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गैरवापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.

जांभळ्या रंगाचे स्केचपेन वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले तरीही विधान परिषद निवडणुकीत गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण नक्की मतदान कोठे केले हे समजावे म्हणून मतदार वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतपत्रिका दाखविणे आवश्यक असते. याच धर्तीवर विधान परिषद निवडणुकीत कायद्यात बदल केला तरच गैरप्रकारांना आळा बसू शकेल.