काँग्रेस आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारांच्या याद्या रविवारी जाहीर केल्या. यामध्ये काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, भाजपाने नारायण राणे आणि केरळ भाजपाचे अध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना राज्यातून संधी दिली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचीही यासाठी चर्चा होती. मात्र, ते दिल्लीत जाण्यास इच्छूक नसल्याने त्यांचे नाव या यादीतून वगळण्यात आले.

कुमार केतकर हे काँग्रेसचे जवळचे मानले जातात. ते डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीचे खंदे समर्थक आहेत. युपीए सरकारच्या काळात त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच राज्यसभेवर त्यांनी वर्णी लागणार अशा चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र, त्यांचे नाव अद्याप प्रतिक्षेतच होते. अखेर आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी कुमार केतकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. केतकर यांचा काँग्रेसच्या भुमिकेला कायमच पाठींबा राहिला आहे. तर, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात त्यांनी नेहमीच टीकात्मक भूमिका घेतली आहे. केतकर यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चांगला अभ्यास असून ते याबाबत नेहमीच हिरीरीने आपली भूमिका मांडत असतात.

त्याचबरोबर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या १८ उमेदवारांची दुसरी यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह केरळचे भाजपा अध्यक्ष व्ही. मुरलीधरन या दोन उमदेवारांचा समावेश आहे. तर, राज्यसभेसाठी उत्सुक नसलेल्या एकनाथ खडसेंचे नाव यातून वगळण्यात आले आहे. सुरुवातीला राणेही राज्यसभेसाठी इच्छुक नव्हते. आपल्याला राज्यातील राजकारणातच रस असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, राज्य मंत्रीमंडळात त्यांचा समावेश करण्यात अडचण येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राज्यसभेसाठी मन वळवले आणि त्यांना एनडीएत समाविष्ट करुन घेतले.