चौथ्या उमेदवाराचा अर्ज भाजप मागे घेण्याचे संकेत

भाजपने चार जणांचा अर्ज भरल्याने राज्यसभेची प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी चौथ्या उमेदवाराचा अर्ज गुरुवापर्यंत मागे घेतला जाईल, असे संकेत भाजपच्या वतीने देण्यात आल्याने राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सात अर्ज दाखल झाल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे तीन उमेदवार निवडून येणार असताना भाजपने चौथा अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली होती. शिवसेनेकडे अतिरिक्त २१ मते असून या मतांच्या आधारे भाजपचा चौथा उमेदवार लढत देण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांचा अर्ज मागे घेतला जाईल, असे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी छाननीच्या वेळी जाहीर केल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

भाजपच्या चौथ्या उमेदवाराचा अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत म्हणजेच गुरुवापर्यंत मागे घेतला जाईल, असे बापट यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. बापट यांच्या या भूमिकेमुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित. प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

मतांचे गणित जुळले नाही?

भाजपने चौथा उमेदवार उभा केला असला तरी शिवसेनेकडील अतिरिक्त मते मिळाल्याशिवाय भाजपची डाळ शिजली नसती. सध्या भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या कटुतेच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आपल्याकडील अतिरिक्त मते देण्याबाबत साशंकताच होती. शिवसेनेकडे मतांसाठी भाजपकडून संपर्क साधण्यात आला नव्हता, असे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजपकडून सातत्याने कोंडी केली जात असल्याने शिवसेनेकडून भाजपला अतिरिक्त जागेकरिता मदत करण्याची शक्यता फारच कमी होती. भाजपचे केरळचे नेते व्ही. मुरलीधरन यांच्या उमेदवारी अर्जाबरोबर संपूर्ण कागदपत्रे दाखल न झाल्यास कोणताही धोका नको म्हणून रहाटकर यांचा चौथा अर्ज भरण्यात आला होता, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.