माहीम येथे महिला पत्रकाराची झालेली छेडछाड आणि पोलिसांकडून पत्रकांराना मिळालेल्या वाईट वागणुकीची पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात स्टेशन प्रभारी म्हणून प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी ठेऊ नयेत; तसेच पत्रकारांची प्रत्येक तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
 रविवारी रात्री गाडीतून जात असलेल्या एका पत्रकार महिलेचा दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांशी खटका उडाला होता. या तरुणांनी महिला पत्रकारास शिविगाळ करून धक्काबुक्की केली. त्यांनतर तिने पोलीस नियंत्रण कक्षाकडे मदत मागितल्यानंतर या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली. या महिला पत्रकाराच्या मदतीस रात्रपाळीत असणारे इतर पत्रकार आले होते. परंतु आरोपींचे नातेवाईकही मोठय़ा संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले आणि त्यांनी इतर पत्रकारांवरच छेडछाड आणि विनयभंगाचे आरोप करायला सुरवात केली. पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. माहीम पोलिसांनी पत्रकारांनाच काही तास बसवून ठेवले होते. पहाटे तीन वाजता पोलीस आयुक्तांना याबाबत कळविल्यानतंर दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी कुमक घेऊन पोलीस ठाण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर पत्रकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या अन्य पाच जणांना अटक करण्यात आली. सोमवारी पत्रकारांनी आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. यावेळी माहीम पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी असल्याने त्यांना परिस्थिती हाताळता आली नव्हती. त्यामुळे यापुढे प्रशिक्षणार्थी पोलीस स्टेशन प्रभारी म्हणून ठेवला जाणार नाही, असे आदेश मारिया यांनी काढले. ते म्हणाले, यापुढे पत्रकाराचे कुठलेही प्रकरण असले वा तो फिर्यादी किंवा आरोपी असला तरी वरिष्ठांना तात्काळ कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पत्रकार व पोलीस यांचीही समिती बनविण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाची चौकशी उपायुक्तांमार्फत केली जाईल.