News Flash

रक्षाबंधनाला ई-गिफ्टिंगकडे तरुणाईचा कल

भेटवस्तू नेमकी काय द्यायची, हा प्रश्न नेहमीच असतो. महागडी भेटवस्तू दिली तर ती आवडेलच असे नाही.

(संग्रहित छायाचित्र)

दिशा खातू

ई-कूपन, ई-गिफ्ट कार्ड, ई-गिफ्ट व्हाऊचरची बाजारात चलती

ई-शॉपिंगकडे असलेला तरुणाईचा कल लक्षात घेऊन रक्षाबंधनच्या निमित्ताने भाऊ -बहिणीला एकमेकांना भेट करता येईल अशा ई-कूपन, ई-गिफ्ट कार्ड, ई-गिफ्ट व्हाऊचरची सध्या बाजारात चांगलीच चलती आहे. ई-भेटीच्या या पर्यायांना तरुणाईचीही पसंती लाभत असल्याने अगदी १० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंतची ई-कूपन, ई-गिफ्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

भेटवस्तू नेमकी काय द्यायची, हा प्रश्न नेहमीच असतो. महागडी भेटवस्तू दिली तर ती आवडेलच असे नाही. त्यावर ई-गिफ्टिंगचा चांगला पर्याय ठरतो आहे. कुठेही असलो तरी हे ई-गिफ्ट कार्ड, गिफ्ट व्हाऊचरची खरेदी करून थेट ई-मेलद्वारे किंवा घरपोच पाठवता येते. त्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. त्यात पर्यायही अनेक आहेत. मुलींची सौंदर्यप्रसाधनांची आवड लक्षात घेऊन अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी रक्षाबंधनकरिता विशेष भेटकार्ड आणले आहेत. याशिवाय बॅग, दागिने, घडय़ाळे, कपडे इत्यादींवर अनेक कंपन्यांच्या संकेतस्थळांनी ई-गिफ्टिंगच्या विशेष ‘कॉम्बो ऑफर्स’ लावल्या आहेत.

केवळ वस्तूच नव्हे तर विविध सेवांकरिताही ही कार्ड उपलब्ध आहेत. सलॉन, स्पा, ब्युटी क्लिनिक येथे ऑनलाइन नोंदणीद्वारे ही गिफ्ट कार्ड खरेदी करून ई-मेलद्वारे पाठवता येतात. फूल विक्रेत्यांनीही आपल्या संकेतस्थळावर रक्षाबंधनकरिता ई-गिफ्ट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत.

याशिवाय अनेक कॅफे, फास्ट फूड, केकच्या नाममुद्रेच्या संकेतस्थळांवरही त्यांचे फूड-कूपन उपलब्ध असतात. हेही सहज डाऊनलोड करून भेटीदाखल देता येतात. फूड-कूपनच्या या ‘ट्रिट’लाही तरुणांची पसंती मिळते. याशिवाय खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या हॉटेलांच्या, मिठाईच्या दुकानांच्या संकेतस्थळांवरही ही सुविधा मिळते.

ई-गिफ्टिंग म्हणजे काय?

भेटवस्तू न देता आपल्या ऐपतीनुसार एखाद्या कंपनीचे भेट कूपन विकत घेऊन ते संबंधित व्यक्तीला पाठवले जाते. बाजारात अनेक नामांकित कंपन्यांचे गिफ्ट कार्ड आणि गिफ्ट व्हाऊचर उपलब्ध आहेत. अनेक नामांकित कंपन्यांनी ई-कॉमर्समध्ये पदार्पण केल्याने त्यांच्या नाममुद्रेच्या वस्तूंकरिता गिफ्ट कार्ड उपलब्ध आहेत. किरकोळ बाजारात ती १० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार ती बनवून दिली जातात. ती ई-मेलद्वारे किंवा घरपोच पाठवता येतात. त्या आधारे त्या किमतीची हवी ती वस्तू संबंधित दुकानातून किंवा त्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदी करता येते.

तरुणांना ऑनलाइन खरेदी नवी नाही. लांब किंवा परदेशात राहणाऱ्या भाऊ-बहिणींना भेटवस्तू पाठवण्याकरिता याचा वापर होतो. पण आता सणासुदीलाही ‘ई-गिफ्टिंग’ करण्याकडे कल वाढत आहे.

– विश्वनाथ भुरके, व्यवस्थापक, ई-कॉमर्स वेब पोर्टल

फक्त संकेतस्थळावरूनच नाही तर समाजमाध्यमांवरूनही भरपूर खरेदी होते. काही कंपन्या वैयक्तिक वापराच्या भेटी समाजमाध्यामाद्वारे घेऊन येतात. त्यातून ग्राहक वस्तूची निवड करून आपल्या बहिणी किंवा भावाच्या आवडीनुसार भेटवस्तू तयार करतात. मग ती भेट कंपनीच थेट संबंधिताच्या घरी पाठवून देते.

– अश्विनी भावसार-शहा, गिफ्ट बड्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:26 am

Web Title: rakshabandhana e giftings youthfulness
Next Stories
1 गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात आग
2 लहान मुलांकडून ‘एमडी’चा पुरवठा
3 आम्ही मुंबईकर : दलित चळवळीचे शक्तिस्थान
Just Now!
X