महाराष्ट्रभर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मानी आपल्या वक्तव्याने या उत्साहाच्या वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकला. गणपतीच्या देवत्वावर प्रश्न उपस्थित करणारी विधाने वर्मा यांनी ‘ट्विटर’वर केल्यानंतर त्यावर टीका सुरू झाली. वाद सुरू झाल्यानंतर वर्मा यांनी माफी मागत त्यास पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
‘गणेशोत्सव नक्की गणपतीचा खरा जन्मदिवस आहे की शंकराने डोके छाटले तो दिवस.’ ‘ज्याला आपले मस्तकाचे रक्षण करता आले नाही? तो तुमचे रक्षण कसे करणार’, असे प्रश्न उपस्थित करणारी विधाने वर्मा यांनी केली, तसेच ‘मला कोणाचा अपमान करायचा नसून या विषयातील अज्ञानामुळे मी हे प्रश्न विचारत आहे.’, असेही त्यांनी ‘ट्विटर’वर नमूद केले.  आपली विधाने अंगलट आल्याचे लक्षात आल्यावर ‘आतापर्यंत सहज म्हणून गणपतीबाबत या पोस्ट टाकल्या आणि अजाणतेपणे यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो’ असे सांगत वर्मा यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, वर्सोवा पोलीस ठाण्यात वर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.