‘२६/११’ च्या हल्ला हा जगातील कुठल्याही अतिरेकी कारवायांपेक्षा भयानक होता. दूरचित्रवाहिन्यांवर जे चित्रण दाखवले जात होते त्यापेक्षाही कितीतरी घटना त्या त्या ठिकाणी घडून गेल्या होत्या. आणि या सुटून गेलेल्याच गोष्टी मला ‘द अटॅक ऑफ २६/११’ या चित्रपटातून दाखवायच्या आहेत. हा हल्ला झाल्यानंतर मी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर ताजमहाल हॉटेल आणि अन्य घटनास्थळांची पाहणी केली. यावरून मी असंवेदनशील असल्याची टीका माझ्यावर करण्यात आली पण, त्या पाहणीच्या वेळी चित्रपट बनवायचा विचार माझ्या डोक्यात नव्हता’, असे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी सांगितले.
रामगोपाल वर्माच्या ‘द अटॅक ऑफ २६/११’ या बहुचर्चित चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच मुंबईत दाखवण्यात आला. यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामूने आपल्यावर झालेली टीका कशी निर्थक होती, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
हा हल्ला कोणी केला हे जिथे आपल्या गुप्तचर यंत्रणेला, मुख्यमंत्र्यांना कोणालाच माहित नव्हते. अशावेळी रितेशला मी कोणती भूमिका देणार होतो? कसाबची की या अतिरेक्यांशी दोन हात करणाऱ्या पोलिसांची?’, असा सवाल राम यांनी केला. माझ्यावर उगाचच टीका करण्यापूर्वी या गोष्टींचा सारासार विचार लोकांनी करायला हवा होता, असे त्यांनी म्हटले.
रितेश देशमुख हा माझा मित्र असल्याने त्याच्यामार्फत मी विलासरावांकडे ताजमहाल हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी ती दिली. त्यावेळी या गोष्टीवरून टीका होईल, हे माझ्या मनात आले नाही तसेच ते विलासरावांनाही वाटले नव्हते. हे हल्ले होत असताना तिथे अनेक गोष्टी घडल्या होत्या आणि त्या तिथे प्रत्यक्ष जाऊन मला जाणून घ्यायच्या होत्या’, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. अभिनेता नाना पाटेकरची मुख्य भूमिका असलेला ‘द अटॅक ऑफ २६/११’ हा चित्रपट २०१३ च्या पूर्वार्धात प्रदर्शित करण्याचा आपला मानस असल्याचेही वर्मा यांनी सांगितले.