महिलांविरोधातील बेताल वक्तव्याबाबत माफी मागून त्यावर पडदा टाकू इच्छिणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात महापालिका सभागृहात काँग्रेस व शिवसेना आक्रमक झाली. मुलींना हात तर लावून दाखवा, हात कापून टाकण्याची हिंमत आमच्यात आहे, असा इशारा शिवसेनेने या वेळी दिला. राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा भाजपनेही निषेध केला.

काँग्रेस नगरसेवकांनी शुक्रवारी हाताला काळ्या पट्टय़ा बांधून पालिका सभागृहात प्रवेश केला. या वेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचे निषेध केला. स्वत:ला राम समजणाऱ्यांनी रावणाचे काम केले आहे. बेटी बचाव, बेटी पढाव.. म्हणणारे आता बेटी भगाव.. असे बोलू लागले आहेत. त्यामुळे मुंबईतील आपल्या मायबहिणी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न या वेळी राजा यांनी उपस्थित केला. राजा यांचा हा मुद्दा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी उचलून धरला. रामावर विश्वास ठेवून महिलांनी राख्या बांधल्या. पण त्याच रामाने रावण रूप घेत, मुली हरण करण्याची भाषा केली. या रावणाने मुलींना हात तरी लावून दाखवावा, हात तोडून टाकू, असा इशारा लांडे यांनी या वेळी दिला.

रावण वृत्तीचा निषेध करायचा तेवढा थोडाच आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या रावणावर लाथ मारून पक्षाबाहेर काढायला हवे होते, असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपला लगावला.  ‘राम कदम’ या वृत्तीविरोधात निषेध प्रस्ताव आणा, अशी मागणी ‘सपा’चे रईस शेख यांनी केली.

भाजपची कोंडी

भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी कदम यांच्या वक्तव्याचे भाजप कधीच समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले. पण महापालिका सभागृह हा राजकीय आखाडा नाही. आजवर अनेक पक्षातील नेत्यांनी बेताल वक्तव्य केले. बोरिवली येथील नगरसेविकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची आठवण करून देत कोटक यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना बोलू न देता चर्चा आटोपती घेतली.